अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवं कर धोरण लागू केल्यानंतर व्यापारविषयक चर्चा सुरू करण्यासाठी पन्नासहून अधिक देशांनी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला आहे. यामुळे गेल्या आठवड्यात शेअर्सचं मूल्य घसरल्यानं अमेरिकेचं सुमारे ६ ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं असलं तरी ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शुल्काला आपला पाठिंबा कायम ठेवला आहे. गेल्या बुधवारच्या घोषणेनंतर ५० हून अधिक देशांनी अमेरिकेशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांनी व्यापारी चर्चेचा पाया म्हणून शून्य शुल्काचा प्रस्ताव ठेवला असून व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं स्पष्ट केलं आहे. तैवानच्या कंपन्यांकडून अमेरिकेतील गुंतवणूक वाढविण्याचं आश्वासन दिलं असल्याचं अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. ट्रम्प यांनी विश्लेषक आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आक्रमक जागतिक शुल्क प्रणालीची घोषणा केल्यानंतर दोन दिवसांत अमेरिकन शेअर्स सुमारे १० टक्क्यांनी घसरले. विश्लेषक आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील या घसरणीला ट्रम्प यांची शुल्कवाढ जबाबदार असल्याचं म्हटलं असून, महागाई वाढण्याचा आणि आर्थिक विकासाला हानी पोहोचण्याचा धोका असल्याची भीती बहुतेक अर्थतज्ज्ञ आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे.
Site Admin | April 7, 2025 1:50 PM | White House
अमेरिकेनं नवं कर लागू केल्यानंतर अनेक देशांचा व्हाईट हाऊसशी संपर्क
