देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची तीव्र लाट सुरु आहे. हवामान विभागानं, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. श्रीनगरमध्ये काल रात्री निचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून डोंगराळ भागात सर्वत्र बर्फ साचला आहे. पंजाबच्या आदमपूर मध्ये १ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्ली आणि परिसरात थंडीबरोबरच हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या तर सर्वत्र दाट धुके साचले आहे. धुक्यामुळे अमृतसर आणि लुधियाना परिसरातही दृश्यमानता कमी झाली आहे. राजस्थानच्या काही भागात चक्रीवादळाचाही धोका वर्तवण्यात आला आहे तर उत्तराखंडमध्येही कडाक्याच्या थंडीबरोबर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लडाखच्या अनेक भागात २७ ते २९ डिसेंबर दरम्यान जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून पर्यटकांनी त्या ठिकाणच्या स्थितीची माहिती घेऊनच आपल्या फिरण्याचं नियोजन करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे.