येत्या दोन दिवसांमध्ये तापमान मध्य भारतात तीन ते चार अंश सेल्शिअसने तर देशाच्या पूर्व भागात दोन ते तीन अंश सेल्शिअसने वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
वायव्य भारतात पुढचे पाच ते सहा दिवस थंडीची लाट पसरेल. हिमाचल प्रदेश पूर्व राजस्थान आणि पंजाब मध्ये येत्या दोनतीन दिवसांमध्ये थंड ते अतीथंड हवामान असेल तर पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश इथल्या काही भागांमध्ये सकाळ संध्याकाळ दाट धुकं आणि राजधानी दिल्लीत पहाटे धुरकं असेल असं विभागानं म्हटलं आहे.
दरम्यान काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी आहे. काही भागांमध्ये तापमान शून्य अंशाखाली गेलं आहे. श्रीनगरमध्ये काही भागांमध्ये शून्याहून खाली सहा अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं होतं. काल रात्री श्रीनगरमध्ये वजा चार अंश सेल्सिअस तापमान होतं. कालची रात्र ही श्रीनगरमधली चालू मोसमातली आतापर्यंतची सर्वात थंड रात्र म्हणून नोंदवली गेली.