नैऋत्य बंगालच्या उपसागरात, श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे येत्या शनिवारपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कमी दाबाच्या पट्टयाचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं. हे चक्रीवादळ शनिवारी सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू किनारपट्टीजवळ प पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मच्छीमारांनी बंगालच्या उपसागरात, श्रीलंकेचा किनारा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
संभाव्य चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी काल जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला. तिरुवरूर, मायिलादुथुराई, नागपट्टणम् आणि कुड्डलोर जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत.