यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ५ टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूंजय मोहपात्रा यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावर्षी पाऊस सरासरीच्या १०५ टक्के होण्याचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या काळात पावसाचं सरासरी प्रमाण ८७ सेंटीमीटर इतकं होतं. यावर्षी मात्र सरासरीच्या ५ टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचं मोहपात्रा यांनी सांगितलं. देशातल्या अनेक भागात सामान्य ते सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडेल, तसंच ईशान्य आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.