देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रकोपामुळे पावसाची शक्यता आहे. काश्मीरच्या डोंगराळ भागात कालपासून हिमवृष्टी होत असून त्यामुळे नदी नाल्यांमधे पाणी वाढलं आहे. गुलमर्ग इथं दोन ते तीन फूट जाडीचा बर्फाचा थर साचला असून त्यामुळे स्थगित झालेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात पुढचे दोन दिवस हिमवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशातही हिमवृष्टी होत असून राज्यातल्या महत्त्वाच्या महामार्गांवर किमान एक फूट जाडीचा बर्फाचा थर साचल्यामुळे अटल बोगद्यासह २११ रस्त्यांवर वाहतूक ठप्प आहे. पुढचे दोन दिवस हिमवृष्टीसह पावसाचीही शक्यता आहे.
पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमधे मुसळधार पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा हवामानविभागाने दिला आहे. चंडीगढ, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात वातावरणात दमटपणा वाढला असून उष्णतेची लाट आहे. मुंबईत सलग दोन दिवस पारा ३८ अंश सेल्सियसच्या पुढे गेला होता.