भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पुढचे २ ते ३ दिवस पंजाब, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप अद्यापही कायम आहे. श्रीनगरमध्ये किमान तापमान १ अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं आहे. कश्मीरच्या अन्य भागात तापमान शून्याच्या खाली गेलं असून लारनू या भागात सर्वात कमी उणे ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. कुपवाडा भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे डोंगराळ भागातली वाहतूक बंद झाली आहे. पुढच्या चोवीस तासात मध्य आणि पूर्व भारतात किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रीलंकेला लागून असलेल्या मन्नारच्या आखातावर तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पुढचे दोन दिवस तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Site Admin | January 21, 2025 1:44 PM | Weather Update