देशात अनेक राज्यांत थंडीची लाट आणि घनदाट धुक्याची चादर कायम आहे. राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसरात दाट धुक्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वे, हवाई वाहतुकीवर तसंच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आज सकाळी दृश्यमानता अधिकच खराब असल्यानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे १५० हून अधिक विमानांची उड्डाणं विलंबाने होत आहेत.
धुकं, थंडीचा कडाका आणि प्रदूषणामुळे दिल्लीतली हवा अतिशय वाईट स्तरावर पोहोचली आहे. उत्तर भारताच्या मैदानी भागात आज आणि उद्या दाट धुकं तर रविवारी पावसाची शक्यता असून तापमानात अधिक घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्येही थंडीची लाट कायम आहे. श्रीनगरमध्ये काल तापमान उणे ४ तर पहलगाम मध्ये उणे १० नोंदवण्यात आलं. इथंही पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहणार असून मैदानी भागात पावसाच्या हलक्या सरी तर डोंगराळ भागात बर्फवृष्टीची शक्यता आहे.
पंजाब, हरियाणा, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशातही उद्या आणि परवा पावसाची तसंच थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवत हवामान विभागानं राज्याला यलो अलर्ट जारी केला आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होऊन तापमानात अधिक घट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. बिहार, झारखंड, ओदिशा आणि ईशान्येकडील राज्यांतही थंडीची लाट आणि घनदाट धुक्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.