केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने येत्या मे महिन्यात मुंबईत जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजनाच्या वेव्हज या शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे मुंबईत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या परिषदेत चित्रपट, टीव्ही, ब्रॉडकास्ट, प्रिंट, रेडिओ, वृत्तपत्रं, नवीन मीडिया, जाहिरात, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, ई-स्पोर्ट्स, संगीत, लाइव्ह इव्हेंट्स इत्यादी मनोरंजनाशी संबंधित सर्व उद्योग क्षेत्रांवर भर देण्यात येईल, अशी माहिती संजय जाजू यांनी या बैठकीत दिली. या पार्श्वभूमीवर या परिषदेची नियोजनबद्ध तयारी सर्व विभागांनी समन्वयातून करावी अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.