माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वेव्ज बाजार’, तसंच ‘वा उस्ताद चॅलेंज आणि वेव्ज पुरस्कार’चा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी ‘वेव्ज २०२५’ चा एक भाग म्हणून ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज सिजन- वन’ साठी जागतिक सहभागाच्या निमंत्रणाचाही प्रारंभ केला.
जागतिक मंचावर भारताला आपली समृद्ध संस्कृती, वारसा, आणि कथाकथनासाठी मोठं महत्व मिळत असल्याचं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. भारत लवकरच सर्जक अर्थव्यवस्थेची राजधानी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारत ही कथाकथनाची भूमी असून वेव्ज अर्थात दृक् श्राव्य आणि मनोरंजन परिषद आणि इतर योजनांमुळे भारताची सुप्त शक्ती जगासमोर येईल, असं गजेंद्रसिंग शेखावत यावेळी म्हणाले. भारताची संस्कृती हेच खरं सामर्थ्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.