मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे स्थानकांदरम्यान काल कोसळलेली दरड काढण्यात जवळपास २४ तासांनी यश आलं आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावरची वाहतूक सुरू होईल. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली रस्ते वाहतूकही सुरळीत झाली आहे. दुपारनंतर पाऊसही ओसरला आहे. यामुळे मुंबई-गोवा आणि मिऱ्या कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग, तसंच राजापूर-कोल्हापूर आणि चिपळूण-कराड मार्गावरची वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीच्या पाणीपातळीत घट होऊन ती आता धोकापातळीच्या खाली आली आहे. राजापूरमधली कोदवली आणि लांज्यातली मुचकुंदी या नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. मात्र, आता पावसाचा जोर ओसरल्याने पाणीपातळीही कमी होऊ लागली आहे. अतिवृष्टीमुळे आज जिल्ह्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कालच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात लांजा आणि राजापूर तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये मिळून सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. ११ गायी-म्हशींचा मृत्यू झाला असून घरं, गोठे, तसंच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचंही नुकसान झालं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, गेल्या रविवारी मागणाववरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह आज सकाळी कुडाळजवळ नदीत आढळून आला.
जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातल्या आंदळगाव इथं रोवणी करत असताना अंगावर वीज पडून कलाबाई गोखले आणि अशा सोनकुसरे या दोघींचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.