गरीब मुस्लिमांच्या भल्यासाठीच वक्फ कायद्यात सुधारणा केल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रीजिजू यांनी आज केला. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. लवकरच वक्फ मालमत्तांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून जगातली सर्वात मोठी वक्फ मालमत्ता देशात असल्याचं ते म्हणाले.
वक्फ सुधारणा कायद्याच्या बाबतीत विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संयुक्त संसदीय समितीने केलेल्या १४ सुधारणा सरकारने मान्य केल्या अशी माहिती या विधेयकाच्या चाचणीसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतलाच नाही. त्यामुळं या सुधारणा असंवैधानिक आहे, असं ते कसं काय म्हणू शकतात, असा सवाल त्यांनी केला.