मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही अडसर नाही, कसलीही नाराजी नाही असं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात आपली ओळख लाडका भाऊ अशी झाली याचं समाधान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महायुती सरकारच्या काळात केंद्राकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला, अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण झाले याचा आनंद असून पुढच्या पाच वर्षांत महायुती म्हणून एकत्र काम करायचं आहे असं शिंदे म्हणाले.
महायुतीच्या, राज्यातल्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत, भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी भेट होणार आहे, त्यात सरकार स्थापनेबाबत निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं.