राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल एसटी कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणाऱ्या विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, या निर्णयानंतर, एसटी कर्मचारी कृती संघटनेने आपला संप मागे घेतल्याचं, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करता येणार आहे. काल मुंबईत राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत नियोजित संप संस्थगित करण्याची घोषणा केली.