महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत २४६ आमदारांनी मतदानं केलं आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी लगेच मतमोजणी होणार आहे. सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदान कशाप्रकारे करावं, पसंतीक्रम कसा ठेवायचा याच्या सूचना आपापल्या आमदारांना दिल्या. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे बारा उमेदवार रिंगणात आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची २३ मतं मिळणं आवश्यक आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी लगेच मतमोजणी होणार आहे.
भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने शेकापाचे जयंत पाटील विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत.