पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची पैलवान विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. अंतिम फेरीच्या आधी तिचं वजन काही ग्रॅमनं अधिक भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं विनेशला अंतिम फेरीचा सामना खेळता येणार नाही आणि तिला पदकही दिलं जाणार नाही. कालच विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय महिला पैलवान ठरली होती. तिनं ५० किलो वजनी गटात क्युबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझ हिच्यावर ५-० अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिचा अंतिम सामना आज रात्री अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डरब्रान्ड्ट हिच्याशी होणार होता.
मात्र, ३००० मीटर स्टीपलचेज स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेकडून पदकाची अपेक्षा कायम आहे. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताच्या संघाला जर्मनीनं ३-२ असं पराभूत केल्यामुळे सुवर्ण किंवा रौप्यपदकाचं त्यांचं स्वप्न भंगलं. आता रौप्यपदकासाठी त्यांचा सामना उद्या स्पेनशी होणार आहे.
याशिवाय, टेबल टेनिसमध्ये भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सांघिक स्पर्धेत मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी जर्मनीविरुद्ध लढत देतील. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी भारोत्तोलक मीराबाई चानू सलग दुसऱ्यांदा पदक जिंकण्याचं ध्येय ठेवून मैदानात उतरेल.
मॅरेथॉन रेस वॉक रिले मिश्र प्रकारात सूरज पन्वर आणि प्रियांका चौधरी महिलांच्या एकेरी स्ट्रोक प्ले स्पर्धेत अदिती अशोक आणि दीक्षा मैदानात उतरतील. अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी, उंच उडीत सर्वेश कुशारे, तर तिहेरी उडीत अब्दुल्ला नारंगोलिंतेविडा आणि प्रवीण चित्रवेल पहिल्या फेरीत खेळतील.
दरम्यान, या स्पर्धेत दोन पदकांची कमाई करणारी नेमबाज मनू भाकर आज भारतात परतली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी आणि चाहत्यांनी तिचं उत्साहाने स्वागत केलं.