सार्वजनिक जीवनातली सचोटी आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी आजपासून देशभरात दक्षता सप्ताह पाळण्यात येत आहे. राष्ट्राच्या भरभराटीसाठी एकात्मतेची संस्कृती विकसित करणं ही या सप्ताहाची संकल्पना आहे. सुशासन तसंच प्रशासनात नैतिकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी अधिक संवेदनशीलतेची गरज लक्षात घेऊन हा सप्ताह आयोजित केला आहे. विविध मंत्रालयं, विविध सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, बँका आणि इतर संस्थामधले सरकारी अधिकारी आज प्रतीज्ञा घेणार आहेत. तसंच भ्रष्टाचारविरोधात जागृतीसाठी आठवडाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. दरवर्षी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या आठवड्यात हा सप्ताह आयोजित केला जातो.
केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि दक्षता आयुक्त ए एस राजीव यांनी आयोगाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात अधिकाऱ्यांना तर आकाशवाणीच्या महासंचालक प्रग्या पलिवाल गौर यांनी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन इथं अधिकाऱ्यांना शपथ दिली.