डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात साडे ९ कोटींहून अधिक मतदार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ मतदार आहेत. ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची भर पडली आहे. यानंतरही विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी यादीत नाव नसलेल्या मात्र पात्र मतदारांना आहे. 

प्रारुप मतदार यादीत राज्यात ९ कोटी ३६ लाखांहून अधिक मतदार होते. २० लाखांहून अधिक दावे आणि पावणे ४ लाखांहून अधिक हरकतींनंतर त्यात १६ लाख ९८ हजार मतदारांची भर पडली. तसंच ऑगस्ट महिन्यात ४ वेळा मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन झालं. विविध संस्था, महाविद्यालयांनी मतदार यादीत नोंदणीसाठी शिबिरं आयोजित केल्यानं नवीन मतदारांच्या संख्येत ११ लाख २३ हजार ३३६ ची भर पडली. ७० वर्षांहून अधिक वय असलेले ५४ हजारांहून अधिक मतदार या यादीतून कमी झाले. अंतिम मतदार यादीत ६ लाख २८ हजार ६३ दिव्यांग मतदार आहेत. विविध पातळीवर झालेल्या प्रयत्नांमुळं मतदार यादीतलं स्री-पुरुष गुणोत्तर ९२५ वरुन ९३३ पर्यंत वाढलं आहे. राज्यात आता ४ कोटी ९३ लाख ३३ हजार ९९६ पुरुष, ४ कोटी ६० लाख ३४ हजार ३६२ महिला आणि ५ हजार ९४४ तृतीयपंथीय आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा