दोन वर्षात राज्यातल्या महायुती सरकारनं रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावासह इतर प्रस्तावांवरील चर्चेला ते उत्तर देत होते.
सिंचन, मागेल त्याला सौरपंप, ८४ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे,या कामांचा उल्लेख फडणवीस यांनी केला.
धारावीचा पुनर्विकास करताना तिथल्या व्यावसायिकांनाही व्यवसाय करण्यासाठी तिथेच जागा देण्यात येईल, असं फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केलं.
राज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असून दोषसिद्धीचं प्रमाण ४५ टक्क्यांपर्यत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं.
येत्या विधानसभा निवडणुकीत राज्याची जनता महायुतीला पुन्हा एकदा संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच, विरोधकांनी दिलेल्या सूचना आणि त्यांनी केलेलं काम याबद्दल त्यांचे आभार मानले.