डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेत आणि विधिमंडळात सर्वपक्षियांनी मैत्रीपूर्ण संवाद ठेवण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

संसदेत आणि विधीमंडळात सर्व पक्षीयांमध्ये संवादाची गरज आहे. सर्वांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संवाद ठेवावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. ते आज मुंबईत विधानभवनात राज्य विधीमंडळाच्या सदस्यांना संबोधित करत होते. सर्वांनी आत्मपरीक्षण करावं, सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तरच जनतेच्या समस्या सोडवू शकतात. त्यामुळे लोकांच्या भल्यासाठी काम करा असं आवाहन त्यांनी केलं.

 

संसद आणि विधीमंडळ ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. गदारोळ घालण्याच्या प्रयत्नांना अजिबात प्रोत्साहन देऊ नका, शिस्तीचं पालन करणाऱ्यांना अधिकाधिक संधी द्या असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. लोकशाहीत संवादाला महत्त्व आहे. पण आजकाल समोरच्या पक्षाची बाजू ऐकून न घेण्याची नवीन पद्धत रुजू झाली आहे. लोकशाहीत याला अजिबात स्थान नाही, विरोधात असलं तरी समोरची बाजू समजून घेण्याचं आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना केलं.

 

लोकशाहीच्या या तिन्ही स्तंभांचे अधिकार आणि कर्तव्य योग्यरित्या वाटून दिलेले आहेत. या तिन्ही स्तंभांना स्वतःच्या जबाबदारीचं पालन योग्यरितीनं करण्याचं आवाहन त्यांनी केलं. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी परस्परांमध्ये संवाद ठेवावा आणि समन्वयानं काम करावं असं आवाहन उपराष्ट्रपती धनखड यांनी केलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यपद्धतीचा दाखला उपस्थितांना दिला. महाराष्ट्र हे देशाचं ‘पावर हाऊस’ असून देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी भक्कम योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

 

महिला, युवा, पर्यावरण बदल यासह जनतेच्या विविध प्रश्नांना कामकाजात प्राधान्य देण्याचं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी बोलताना केलं. तर भारतीय लोकशाही बळकट करण्याची भूमिका उपराष्ट्रपतींनी नेहमीच घेतली आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकशाहीला बळकट आणि लोकशाहीच्या तत्त्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी उपराष्ट्रपतींची उपस्थिती महत्त्वाची असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. उपराष्ट्रपतींनी केलेलं मार्गदर्शन हे भविष्यात कामकाज करायला उपयुक्त ठरेल असं उपसभापती नीलम गोऱ्हे समारोप करताना म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा