ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांना काल भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी काल सकाळी टाटा यांचं पार्थिव शरीर एन सी पी ए इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास; अनेक उद्योगपती, टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी, तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी टाटा यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.