ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येतील. स्थापत्य अभियंता असलेले संझगिरी, मुंबई महानगरपालिकेतून मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले होते. १९८० पासून त्यांनी विविध वृत्तपत्रातून क्रीडाविषयक लेखन केलं.
सलग ११ विश्वचषकांचं वार्तांकन करणारे ते एकमेव पत्रकार मानले जातात. त्यात कपिल देव आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्त्वात जिंकलेल्या विश्वचषकांचा समावेश होता. मराठीतलं पहिलं क्रीडा पाक्षिक एकच षट्कारचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं. क्रिकेटविषयीची त्यांची ४० पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत. त्याखेरीज प्रवासवर्णन, सामाजिक विषयांवरही त्यांनी लेखन केलं. राज्यशासनाचा साहित्य पुरस्कार तसंच पत्रकारिता क्षेत्रातले विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.