देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो.
शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्ट वर लिहिलं आहे. लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनीही देशवासियांना वसंतपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंढरपुरात आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुख्मीणीचा विवाह सोहळा झाला. यावेळी रुख्मिणीला शुभ्र वस्त्र, मोत्याचे दागिने, अलंकार परिधान करण्यात आले होते. विविध अलंकारांनी नटलेल्या मूर्ती विठ्ठल आणि रखुमाईच्या शाही मंडपात आणण्यात आल्या, तिथं भाविकांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांच्या घोषात दोन्ही देवतांचंं लग्न लागलं. सोहळ्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.