१२ वी वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा आज झाली. देशातल्या सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकंदर ५८ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
ऑलिम्पिक पदकविजेती पैलवान साक्षी मलिक या मॅरेथॉनची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून उपस्थित होती.
थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर फायदा घेत वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेत सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. २ तास, १८ मिनिटं आणि १९ सेकंदांची वेळ नोंदवत साताऱ्याचा कालिदास हिरवे यानं पुरुषांच्या शर्यतीत बाजी मारली. त्याचा विक्रम फक्त पाच सेकंदांनी हुकला. त्याचा जवळचा मित्र प्रदीपसिंह चौधरी पाच सेकंदांच्या फरकानं दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर या स्पर्धेत प्रत्येकी दोनदा विजेतेपद आणि उपविजेतेपद पटकावणारा विक्रमवीर मोहित राठोडला तिसरं स्थान मिळालं.
पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये थरारक शर्यतीत नौदलाच्या रोहित वर्मा यानं नितेश रथवा याला अवघ्या एका सेकंदाने मागे टाकत विजेतेपद पटकावलं. विशेष गोष्ट अशी, की २०१९मध्ये अनिश थापाने नोंदवलेला १ तास, ४ मिनिटं आणि ३७ सेकंदांचा विक्रम यंदा अव्वल पाच धावपटूंनी मोठ्या फरकानं मोडला. महिला गटात हरियाणाची रेल्वे कर्मचारी सोनिका हिनं हाफ मॅरेथॉन १ तास, १३ मिनिटं आणि २२ सेकंदांची वेळ नोंदवून जिंकली. हरियाणाच्या भारती हिला उपविजेतेपद मिळालं, तर साक्षी जड्याल तिसऱ्या क्रमांकावर राहिली.