देशभरात आज गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. हा दिवस मानवी जीवनात ज्ञान आणि अभ्यासाच्या महत्वाची तसंच आदरणीय गुरूंची आठवण करून देतो. आजचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आणि आध्यात्मिक गुरूंना वंदन करून आदरभाव व्यक्त करतात. यानिमित्तानं आज शाळा, महाविद्यालयात आणि विविध समुहात विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.
राज्यात शिर्डी, अमरावती आणि शेगाव इथंही गुरू पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. भगवान बुद्धांनी दिव्यज्ञान प्राप्ती नंतर आजच्याच दिवशी आपला पहिला धर्मोपदेश दिला होता. त्यामुळे बुद्ध अनुयायी देखील आजच्या दिवशी विशेष बुद्ध वंदना करतात.
गुरू वंदनेचा आजचा दिवस भारतासह भूतान आणि नेपाळमध्येही साजरा केला जातो. गुरू पौर्णिमेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टद्वारे देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.