मुंबईत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ‘सायकल रॅली’ आणि पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. विलेपार्ले इथल्या दुभाषी मैदानातून सायकल रॅलीची सुरुवात झाली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना ‘स्वीप’ उपक्रमा अंतर्गत मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली.
स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आज पथनाट्य सादर करुन नागरिकांना त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्याबाबत आवाहन करण्यात आलं.
नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामुहिक प्रतिज्ञा घेतली.
कोल्हापूर जिल्ह्यात ८० टक्क्यांहून जास्त मतदानाचं लक्ष्य गाठण्यासाठी लोकशाही दौड आयोजित करण्यात आली. यावेळी सहभागी धावपटूंनी मतदान करण्याचा संकल्प केला.
अमरावतीमध्ये मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आज पार पडला.