नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध्यमातून देण्यात आले. त्याबरोबरच सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत मतदानाची शपथ दिली.
लातूर ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मतदान जनजागृतीच्या पथकाने गावात गृहभेटी देवून मतदार जागृतीस सुरुवात केली आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात ज्या गावांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा भागात, विशेष फेरी काढून, मतदान संकल्प पत्राचं वाचन करून मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. याअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांच्या मार्गदर्शनातून, अंतरवाली सराटी, नालेवाडी वाळकेश्वर, शहागड, महाकाळा अंकुशनगर कारखाना, वडीगोद्री, शहापूर आणि दाडेगाव या गावांमध्ये, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं फेरी काढण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक मतदानाचं लक्ष्य गाठण्यासाठी जिल्ह्यातले सर्व मतदार मिळून ‘आम्ही कोल्हापुरी जगात लय भारी पार करणार 80 टक्केवारी’ असा संकल्प करुया, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल केलं. कोल्हापूर इथं मतदान जनजागृतीसाठी आयोजित लोकशाही दौडचा प्रारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. या लोकशाही दौडमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले होते. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनीही यात मोठ्या संख्येनं भाग घेतला. यावेळी उपस्थित सर्वांना मतदान प्रतिज्ञा देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात आकुर्डी इथल्या जैन स्थानकात मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी साध्वी डॉक्टर राजश्रीजी, डॉक्टर मेधाश्रीजी यांच्या उपस्थितीत शंभर टक्के मतदान करण्याची शपथ जैन बांधवांनी घेतली. शिरुर विधानसभा मतदारसंघात तळेगाव ढमढेरे आणि वाघोली ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी सेविका तसंच ग्रामस्थांनी मतदानाची शपथ घेतली. यावेळी शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी 74 उपाहारगृहांनी मतदान केलेल्या मतदारांसाठी 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी देयकावर 10 टक्के सवलत जाहीर केली आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या सवलतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केलं आहे.