तामिळनाडू आणि काशी यांच्यादरम्यान सांस्कृतिक आणि बौद्धिक सहसंबंधांना चालना देणारा काशी तामिळ संगम महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीला आजपासून उत्तरप्रदेशच्या वाराणसी इथं प्रारंभ होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्य मंत्री डॉ. एल मुरूगनही यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
दहा दिवसांच्या या महोत्सवात विद्यार्थी, तज्ज्ञ, विद्वान, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार तसंच सर्व स्तरातल्या नागरिकांना एकत्र येण्याची, ज्ञान, संस्कृतींची देवाण घेवाण करण्यासाठी तसंच एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी देतो. युवकांना सांस्कृतिक एकतेची जाणीव करून देणे आणि त्याचा अनुभव घेण्याची संधी देणे हा देखील महोत्सवाचा उद्देश आहे. यावर्षी पहिल्यांदाच सहभागींना प्रयागराजमधील महाकुंभ पाहण्याची आणि अयोध्येत राम मंदिराला भेट देण्याची संधी मिळणार आहे.