राज्यशासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार काल जाहीर झाले. या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव उर्फ रा रं बोराडे यांना जाहीर झाला आहे. श्री.पु. भागवत पुरस्कार, पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.रमेश सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेलाही भाषा संवर्धनासाठी मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे.
इतर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये रेखा बैजल यांना साने गुरूजी पुरस्कार, सुनीता सावरकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ तारखेला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाला ‘कवितांचे गाव’ म्हणून, रत्नागिरी जिल्ह्यात कवी केशवसूत यांच्या मालगुंड या गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.