महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेला वंचित बहुजन आघाडीचा ‘जोशाबा समतापत्र’ या नावाचा निवडणूक जाहीरनामा काल पुण्यात, पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. महिलांना मासिक 3500 रुपये वेतन, शेतमालाला हमीभाव देणारा कायदा, जात जणगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी, बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल अशा विविध मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा राज्यातील जनता स्वीकारेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मत देईल असा विश्वास आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.