शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोन्याचं पान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचं, वीरतेचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवशस्त्रशौर्यगाथा या उपक्रमा अंतर्गत शिवरायांची वाघनखं, समारंभपूर्वक प्रदर्शित करण्यात आली; तसंच अन्य शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं; त्यावेळी ते बोलत होते.
शिवरायांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य साकार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण देशातील नागरिक, ही वाघनखं पाहण्यासाठी येतील, आणि त्यातून प्रेरणा घेतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या वेल्हा तालुक्याचं नाव आता राजगड करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गड-किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याचं आवाहन नागरिकांना केलं. या कार्यक्रमात शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तसंच संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा 4 टपाल तिकीटांचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.