वाढवण बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केला. वाढवण बंदराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पालघर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.
आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं वाटचाल करताना हे बंदर एक महत्वाची भूमिका बजावेल, असं ते म्हणाले. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळेल, असं सोनोवाल यांनी सांगितलं. स्थानिकांशी चर्चा करून राज्य सरकारच्या नियमांनुसार त्यांना मोबदला दिला जाईल तसंच रोजगारासाठी आवश्यक कौशल्यं स्थानिक युवकांना शिकवली जातील, अशी माहिती केंद्रीय बंदर, जलमार्ग आणि नौवहन, सचिव टी. के. रामचंद्रन यांनी दिली.