महिलांना होणाऱ्या कर्करोगावर प्रतिबंधक लस येत्या पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. यात प्रामुख्यानं तोंडाचा, स्तनांचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरच्या लसीचा समावेश आहे.
ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या लसीवरचं संशोधन जवळपास पूर्ण झालं असून चाचण्यांना सुरुवात झाली आहे. लवकरच ही लस उपलब्ध होईल आणि ९ ते १६ वर्षं वयोगटातल्या मुली लसीकरणासाठी पात्र असतील, असंही जाधव म्हणाले.
तसंच, ३० वर्षांवरच्या महिलांची रुग्णालयांमध्ये तपासणी केली जाईल आणि रोगाचं निदान लवकर होण्यासाठी डेकेअर कर्करोग केंद्रं स्थापन केली जातील, अशी माहितीही जाधव यांनी यावेळी दिली.