उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री नऊ वाजता बंद करण्यात आले. त्यानिमित्त काल बद्रीनाथ मंदिर १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या सिंहद्वार संकुलात गढवाल स्काऊट बँडतर्फे वंदन करण्यात आलं. त्या भक्तिमय सुरांनी संपूर्ण बद्रीनाथ परिसर दुमदुमून गेला होता.
शनिवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी बद्रीनाथ धामला भेट देऊन मंदिर बंद करण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी संपूर्ण प्रवासादरम्यान भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेचं काम पाहणाऱ्या बद्रीनाथ मंदिराच्या आवारातील ‘पर्यावरण’ मित्र, पोलिस दल, आयटीबीपी आणि मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. वैदिक विधी आणि धार्मिक परंपरांनुसार मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.