उत्तर प्रदेशातल्या मानकापूर विभागातल्या गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड-दिब्रूगढ एक्सप्रेसचे २३ पैकी २१ डबे आज रुळावरून घसरले. या अपघातात २ जण मरण पावले तर २० जण जखमी झाले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं मदतकार्य सुरू केलं असून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलांची मतपथके घटनास्थळी पोहोचली आहेत. या अपघातामुळे लखनऊ ते गुवाहाटी रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत आणि बचावकार्य अधिक वेगानं व्हावं असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत शासनानं जाहीर केली असून अपघाताच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.