गाझामध्ये युद्धविराम घोषित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आज इस्रायलची राजधानी तेल अवीव इथं पोहोचले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर आत्तापर्यंत ब्लिंकन यांनी नऊ वेळा पश्चिम आशियाचा दौरा केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात कैरो इथं सुरू असलेल्या चर्चेवर ते लक्ष ठेवतील. तसंच इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयजॅक हेरझॉग, प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांचीही भेट ते घेतील.
दरम्यान, इस्रायलनं मध्य गाझातल्या अल झवायदा इथं केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातले किमान १५ जण ठार झाले आहेत. यात नऊ लहान मुलांचाही समावेश असल्याचं गाझाच्या संबंधित विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. तर दक्षिण लेबनॉनमधल्या नाबातियेह इथल्या इस्रायहलच्या हवाई हल्ल्यात किमान १० जणांचा मृत्यू झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.