अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडन यांनी काढलेले ७८ धोरणात्मक आदेश मागे घेतले आहेत. तसंच काही आदेश नव्यानं लागू केले आहेत. अमेरिकेत बेकायदा वास्तव्याला असलेल्यांच्या तसंच पर्यटक, विद्यार्थी आणि वर्क व्हिसावर आलेल्यांच्या मुलांना जन्मामुळे आपोआप मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा आदेश ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिका संस्थापक सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा आदेश ट्रम्प यांनी जारी केला आहे. कोविड काळातली परिस्थिती या संघटनेनं चुकीच्या पद्धतीनं हाताळली आणि तत्काळ गरज असलेल्या उपाययोजना आखण्यात या संघटनेला अपयश आल्याचं कारण त्यांनी आदेशात दिलं आहे. तसंच पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर टेड्रॉस घेब्रेयेसस यांनी ट्रम्प यांच्या आदेशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका हा या संघटनेचा सगळ्यात मोठा देणगीदार असून अमेरिका त्यातून बाहेर पडल्यामुळे भविष्यात जागतिक आरोग्य निधी उभारताना अनेक अडचणी येतील असं त्यांनी म्हटलं आहे.