अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के तर चीनवर २० टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क आजपासून लागू झालं आहे. कॅनडाने १५० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकी वस्तूंवर २५ टक्के कर लादणार असल्याचं म्हटलं आहे.
चीनने अमेरिकेच्या कृषी आयातीवर १० ते १५ टक्के कर लावण्याची घोषणा केली असून मेक्सिकोनेही प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे. या करांमुळे कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत येणारे अंमली पदार्थ आणि स्थलांतरितांना आळा घालण्यासाठी अधिक कारवाई करता येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले.
या वाढत्या व्यापार युद्धाच्या शक्यतेमुळे अमेरिकन ग्राहकांना किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइलसह काही उत्पादनांसाठी जास्त किंमत मोजावी लागेल असा इशारा तज्ञांनी दिला आहे. दरम्यान अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण झाली असून व्यापारयुद्धाच्या शक्यतेमुळे आशियाई बाजारात अस्वस्थता आहे.