केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजना सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी स्वागत केलं आहे. ते बिहारमध्ये पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचं योगदान १४ टक्क्यावरून साडे अठरा टक्क्यापर्यंत वाढवायचा निर्णय घेतला आहे, देशातल्या राज्य सरकारांनीही याला आदर्श प्रारुप मानत, आपापल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाची प्रशंसा केली आहे. हा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचललेलं ऐतिहासिक पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारांनीही हे प्रारुप राज्यांमध्ये लागू केलं, तर त्याचा 90 लाख कर्मचाऱ्यांना लाभ होईल असं त्यांनी म्हटलं आहे.