रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं १२व्या ट्रॅफिक इन्फ्राटेक एक्स्पोला ते संबोधित करत होते. रस्ते बांधणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे हे त्यांनी यावेळी अधोेरेखित केलं. रस्ते बांधणीसाठीच्या आधुनिक पद्धती मांडण्यासाठी सरकार अभियंत्यांना प्रोत्साहन देत आहे, असंही गडकरी म्हणाले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण बांधत असलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल, अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकार खासगी क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नियुक्ती करत आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. रस्त्याची गुणवत्ता राखणारी, कायद्याची अंमलबजावणी करणारी आणि पथनाक्यांचं व्यवस्थापन करणारी प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न हे तज्ज्ञ करतील असं गडकरी म्हणाले.