पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक विकास आणि कृषी क्षेत्रासोबत सांस्कृतिक विकास आणि एकता यावर सरकारनं विशेष भर दिला आहे. देशाच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा आधार देशाच्या भाषा आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना केलं. भारतात १२१ प्रमुख भाषा आणि जवळपास सोळाशे बोलीभाषा आहेत. भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नसून ज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा महत्त्वाचा वारसा आहे. केंद्र सरकारनं भाषा आणि बोलींचं जतन आणि संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, कारण भाषा हे सक्षमीकरण आणि वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी महत्त्वाचं माध्यम आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या वर्षी ऑक्टोबरमध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असून ११ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देणारा भारत हा एकमेव देश आहे, असंही ते म्हणाले.
Site Admin | December 18, 2024 1:21 PM | Union Minister G. Kishan Reddy