देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात, १,४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे. वनं सर्वेक्षण विभागानं २०२३ मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. सध्या एकूण आठ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र, वन आणि वृक्षाच्छादित असून, ते देशाच्या एकूण भूभागाच्या, २५ पूर्णाक एक दशांश टक्के इतकं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
छत्तीसगड, उत्तरप्रदेश, ओडीशा आणि राजस्थानात, वनक्षेत्र वेगानं वाढलं असून, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात, अद्याप मोठी जंगलं टिकून आहेत. या आधीच्या पाहणीच्या तुलनेत, झाडा झुडुपांच्या स्वरूपातला कार्बन साठा देखील, आठ कोटी १५ लाख टनांनी वाढला असून, तो ७२८ कोटी ५५ लाख टनांच्या आसपास पोहोचला आहे.