केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरु होणाऱ्या, जागतिक आर्थिक मंच २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. प्रगतीपथावर मागे पडलेल्या वर्गांसह समाजातल्या सर्व स्तरांच्या विकासासाठी देशानं अनेक पावलं उचलली आहेत, असं वैष्णव यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी सांगितलं.
पाच दिवसांच्या जागतिक आर्थिक मंच कार्यक्रमात, समावेशक विकास तसंच सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण या मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले. भारताचं आर्थिक धोरण, डिजिटल संरचना तसंच समाजाच्या सर्व घटकांना सक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याबाबत जाणून घेण्यासाठी जग उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं.
या परिषदेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री रवाना झाले. उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत आहेत. डाटा केंद्रं, स्वयंचलित वाहनं, सेमीकंडक्टर, विद्युत वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधं आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौर्यात होणार आहेत.