देशाला एकसंध ठेवण्यात हिंदी भाषेची महत्त्वाची भूमिका असून या भाषेचं रक्षण आणि संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं राजभाषा हीरक जयंती उत्सवनिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये कोणतीही स्पर्धा नसून त्या एकमेकांना पूरक असल्याचं शहा म्हणाले. मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणावर विशेष भर दिल्याचंही त्यांनी सांगितलं. हिंदी राजभाषेच्या हीरक महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं लोकार्पण शहा यांनी केलं.