आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला. मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं. कुठल्याही सर्व्हेचा विचार करू नका, महायुती पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं.
प्रदेश भाजपा निवडणुकीसाठी जी योजना बनवेल ती योग्यरितीनं कार्यान्वित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मतदानाचं प्रमाण १० टक्क्यांनी वाढवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. संध्याकाळी त्यांनी नवीमुंबईत वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत मार्गदर्शन केलं. या वेळी त्यांनी कोकण आणि ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.