केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांपर्यंत खाली आला असून येत्या काही वर्षात हा दर 3 टक्क्यांच्या खाली येईल असा विश्वास श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.
येत्या 5 वर्षांत 4 कोटीपेक्षा जास्त युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळतील, असं ते म्हणाले. लोकसभेत कालही अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू होती; यावेळी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणनेची मागणी केली.
यंदाचा अर्थसंकल्प हा केवळ श्रीमंतांसाठी होता; यात गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काहीच नव्हतं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. शेतकऱ्यांना हमी भावाची खात्री देणाऱ्या कायद्यावरही यामध्ये भाष्य करण्यात आलेलं नाही, असा आरोप त्यांनी केला.