चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागायला हवी, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीयो यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांना रशियाला वाटाघाटी करायला राजी करायचं असून रशिया – युक्रेन संघर्ष थांबवायचा आहे, असं रुबीयो म्हणाले.
व्हाईट हाऊस मधे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी काल रात्री झालेल्या चर्चेत शाब्दिक चकमक झडली होती. झेलेन्स्की यांच्या मनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर पुतीन यांच्याबद्दल द्वेष आहे, त्यामुळे हा संघर्ष थांबवणं त्यांच्यासाठी कठीण आहे, असं ट्रम्प यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना सांगितलं होतं. झेलन्स्की यांनी लाखो लोकांचा जीव धोक्यात घातला असून ते तिसऱ्या महायुद्धाला कारण ठरू शकतात, असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, वोलोदिमीर झेलेन्स्की उद्या होणाऱ्या युरोपियन सुरक्षा परिषदेसाठी ब्रिटनमधे पोहोचले आहेत. तिथं ते ब्रिटनचे प्रधानमंत्री केर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशीही झेलेन्स्की चर्चा करतील.