उडे देश का आम नागरिक या प्रादेशिक विमान संपर्क योजनेला काल आठ वर्षं पूर्ण झाली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं २१ ऑक्टोबर २०१६ ला ही योजना सुरू केली होती. UDAN योजनेत देशातील विमान सेवा नसलेल्या प्रदेशांमध्ये विमान मार्ग सुधारण्यावर आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत, ६०० हून अधिक विमान मार्ग कार्यान्वित झाले आहेत. आणि एक कोटी ४४ लाखांहून अधिक प्रवाशांनी विमानांद्वारे प्रवास केला आहे. या योजनेखाली आतापर्यंत देशातील ३४ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडलं आहे. दोन हेलीपोर्ट्स व्यतिरिक्त ईशान्य प्रदेशात दहा विमानतळ देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत. उडान योजना केवळ द्वितीय आणि तृतीय स्तरातील शहरांना संपर्क व्यवस्था प्रदान करत नाही तर पर्यटन क्षेत्रासाठी देखील एक प्रमुख सुविधा म्हणून सिद्ध झाली आहे. विमान संपर्क आणि प्रादेशिक वाढीला चालना देऊन ही योजना अनेक विमानतळांसाठी बदलाचा हुकुमी एक्का बनली आहे.