माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. त्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या भेटींमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
त्यापूर्वी वार्ताहर परिषदेत ठाकरे यांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेला विरोध केला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ईव्हीएमच्या विरोधाला आणि मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.