माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवले जातील. मुलांना मोफत शिक्षण त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुढीकोठा इथं जाहीर सभा झाली. महायुतीचं शेतकरीविरोधी सरकारला पराभूत करुन राज्यात बळीराजाचे राज्य आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
राज्यात सध्या बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा असून, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक बेरोजगाराला नोकरी मिळेपर्यंत दर महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज दापोली इथल्या मविआ उमेदवार संजय कदम यांच्या प्रचार सभेत दिलं.
‘या वेळची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असल्याचं आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं. तर दहशतीतून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन दापोली विधानसभा मतदारसंघातले उमेदवार संजय कदम यांनी यावेळी केलं.
आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांच्या विचारांचं एक अधिष्ठान आहे, पण या आंबेडकरी चळवळीत काही जणांनी दलाल स्ट्रीट उभी केलीय. ही दलाल स्ट्रीट नष्ट केल्याशिवाय आंबेडकरी चळवळीला भवितव्य नाही. हाच विचार घेऊन आम्ही घटनेचा आदर राखणार्या मविआला यंदाच्या निवडणूकीत जाहीर पाठींबा देत आहोत अशी घोषणा रिपब्लिकन एकता आघाडीचे निमंत्रक आणि ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी आज मुंबईत केली.